लखनऊ: उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीसाठी (Uttar Pradesh Assembly Election 2022) काँग्रेसने जोरदार कंबर कसली आहे. काँग्रेसने या निवडणुकीत पक्षातील स्टार नेत्यांना स्टार प्रचारक म्हणून उतरवले आहे. कन्हैय्या कुमार (Kanhaiya Kumar) हे सुद्धा काँग्रेसचे स्टार प्रचारक आहेत. ते काँग्रेसच्या प्रचारासाठी लखनऊमध्येही दाखल झाले आहेत. काँग्रेस कार्यालयात (Congress Office) कार्यकर्त्यांशी संवाद साधत असताना एका व्यक्तिने कार्यालयात घुसून कन्हैय्या कुमार यांच्यावर शाईफेक (Ink Thrown) केली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते भडकले आणि त्यांनी शाईफेक करणाऱ्याला बदड बदड बदडले. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यालयात एकच गोंधळ उडाला. कन्हैय्या कुमार यांनी आज लखनऊ सेंट्रलचे उमेदवार सदफ जफर यांच्या प्रचारात भाग घेतला होता. त्यानंतर कार्यालयात आले असता त्यांच्यावर शाई फेकण्यात आली.
लखनऊ विधानसभेत एकूण 9 जागा आहेत. मात्र, लखनऊ सेंट्रलच्या जागेची जोरदार चर्चा सुरू असून सर्वांचं या जागेकडे लक्ष लागलं आहे. लखनऊ सेंट्रलवर भाजपचं वर्चस्व राहिलेलं आहे. या जागेवर भाजपने एक दोन नव्हे तर सातवेळा विजय मिळविलेला आहे. 2017च्या विधानसभा निवडणुकीत या जागेवर योगी सरकारमधील बलाढ्य मंत्री ब्रजेश पाठक मैदानात होते. त्यांनी तत्कालीन समाजवादी पार्टीचे आमदार रविदास मेहरोत्रा यांना पाच हजार मतांनी पराभूत केलं होतं. आता 2022 च्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे. येत्या 23 तारखेला या जागेवर मतदान होणार आहे. त्यामुळे या जागेच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
2017च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेत भाजपने मोठा विजय मिळविला होता. लखनऊ पश्चिममधून भाजपचे उमेदवार सुरेश कुमार श्रीवास्तव यांनी सपाचे उमेदवार मोहम्मद रेहान यांचा 13072 मतांनी पराभूत केलं होतं. या मतदारसंघात राजधानी लखनऊमधील अनेक महत्त्वाचे भाग येतात. जुन्या लखनऊचा भाग या मतदारसंघात अधिक येतो. ही जागा बहुतांश वेळा भाजपच्या ताब्यात राहिलेली आहे. 1989मध्ये पहिल्यांदा भाजपचा जनाधार वाढला आणि या जागेवर भाजपने विजय प्राप्त केला. या निवडणुकीत रामकुमार शुक्ला विजयी झाले होते.
त्यानंतर 1991 आणि 1993मध्येही रामकुमार शुक्ला विजयी झाले होते. त्यानंतरचा भाजपचा विजयी रथ सुरूच राहिला. 1996, 2002 आणि 2007मध्ये सलग तीनदा लालजी टंडन येथून निवडून आले. 2009च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे एसके शुक्ला विजयी झाले होते. तर 2012च्या निवडणुकीत सपाचे मोहम्मद रेहान यांनी भाजपच्या सुरेश कुमार श्रीवास्तव यांचा 7812 मतांनी पराभव केला होता.