अहमदनगर- पाथर्डी शहरातील शेवगाव रोडवर असणाऱ्या डॉ.विनोद गर्जे यांच्या कोविड हॉस्पिटलची समाजामध्ये बदनामी थांबवण्यासाठी १० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन माध्यमिक शिक्षक,एक शिक्षणसंस्था संस्थाचालक व एक शिवसेनेचे पदाधिकारी अशा चौघा विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास सुरु असताना पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या पथकाने एका आरोपीस अटक केली आहे. तर इतर आरोपींचा शोध पोलीस सुरु आहे .
मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी डॉ. विनोद त्रिंबक गर्जे यांनी कोविड हॉस्पिटल चालवण्या संदर्भात रीतसर परवाना घेतला आहे. यासाठी लागत असलेली आवश्यक माहिती पंचायत कार्यालयात सादर केलेली आहे. मात्र तरीदेखील शैलेंद्र जायभाय याने डॉ. नवनाथ आव्हाड,अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय पाथर्डी यांचेकडे माहिती अधिकारा अंतर्गत गर्जे हॉस्पिटलची माहिती मागवली होती. माहिती डॉ.गर्जे यांनी परस्पर जायभाय यास कळवण्यास लेखी पत्राने सांगितले होते. परंतु शैलेंद्र जायभाय व शिवसेनेचा पदाधिकारी नवनाथ उगलमुगले यांनी डॉ. गर्जे यांना डॉ. आव्हाड यांचे समोर दि. १४ जानेवारी रोजी १० लाखांची खंडणी मागितली व रक्कम न दिल्यास पेपरमध्ये हॉस्पिटलच्या बातम्या देवून बदनामी करत हॉस्पिटल बंद पाडण्याची धमकी दिली होती.
त्यानंतर डॉ. विनोद गर्जे हे खरवंडी येथे कार्यक्रमानिमित्त दि.२५ जानेवारी रोजी गेले असता मिथुन डोंगरे यांनी मध्यस्थी करत बदनामी टाळण्यासाठी तडजोडी करत पुन्हा चार लाखांची खंडणी मागितली.तडजोडी अंती तीन लाख खंडणी देण्याचे ठरले. सरकारी पंचासमक्ष शैलेंद्र प्रल्हाद जायभाये (रा. खरवंडी ता. पाथर्डी),मिथुन दगडू डोंगरे (रा.जवळवाडी ता.पाथर्डी), मच्छिंद्र राधाकिसन आठरे (रा.आनंदनगर,पाथर्डी) यांना खंडणीची रक्कम स्वीकारताना पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे,पोलीस कॉन्स्टेबल भगवान सानप,पोलीस नाईक अनिल बडे,पोलीस नाईक देविदास तांदळे, पोलीस नाईक राहुल तिकोने, पोलीस नाईक रामदास सोनवणे यांच्या पथकाने तनपुरवाडी शिवारात छापा टाकून रंगेहाथ पकडले.
मात्र पोलीस आल्याची चाहूल लागताच आरोपी शैलेंद्र जायभाय व मिथुन डोंगरे हे वॅग्नोर गाडीतून पळून गेले. परंतु आरोपी मच्छिद्र राधाकिसन आठरे यास पोलिसांना पकडण्यात यश आले.











