पाथर्डी – जमिनीच्या वादावरून माका ( ता. नेवासा) ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचाच्या मुलाने मिरी (ता.पाथर्डी) ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचाच्या मुलावर पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील गट नंबर १९८/१ मधील ३६.५० आर ही जमीन जगदीश चंद्रकांत सोलाट (रा.मिरी,ता.पाथर्डी) यांच्याकडून राहुल नाथा घुले (रा.माका, ता.नेवासा) यांनी मार्च २०२१ मध्ये खरेदी केली होती. नुकताच या जागेमध्ये घुले यांनी नवीन पेट्रोल पंप टाकण्यासाठी जागेची मोजणी करून सदर जागेला संरक्षण भिंत बांधली होती. परंतु या जागेचे पूर्वीचे मालक जगदीश चंद्रकांत सोलाट यांनी सदर जागेवर येऊन मजुरांना शिवीगाळ केली तसेच त्यांच्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने सदर संरक्षण भिंत पाडून . या प्रकरणी राहुल टाकली. नाथा घुले यांनी पाथर्डी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. त्यावरून जगदीश चंद्रकांत सोलाट यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाथर्डी पोलिस करत आहेत.
यामध्ये फिर्यादी असलेले राहुल नाथा घुले यांचे वडील नाथा घुले हे नेवासा तालुक्यातील माका गावचे विद्यमान सरपंच व सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक असून आरोपी जगदीश चंद्रकांत सोलाट यांच्या आई देखील पाथर्डी तालुक्यातील मिरी गावच्या माजी सरपंच आहेत त्यामुळे एका सरपंचाच्या मुलाकडुन माजी सरपंचाच्या मुलावर गुन्हा दाखल झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले आहे.