कोल्हापूर : घरगुती वादातून पतीने धारदार शस्त्राने वार पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे घडली आहे. इम्तियाज राजु नदाफ असे हत्या करणाऱ्या पतीचे नाव आहे तर समिना इम्तियाज नदाफ असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आरोपी पतीला अटक केली आहे.
समिना नदाफ या चिकन 65 चा व्यवसाय करत होत्या. त्या रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या चिकन 65 च्या गाड्यावर काम करत असताना तिथे त्यांचा पती दारू पिऊन आला. यावेळी नशेत असलेल्या पतीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. यावेळी घाबरलेल्या पत्नी समिना नदाफ या धावत शेजारील टेलरच्या दुकानात पळत गेल्या. मात्र टेलरच्या दुकानात लपण्यासाठी गेलेल्या समिना यांचा त्यांच्या पतीने पाठलाग गेला.
तसेच आपल्याच पत्नीचा गळा चिरून तसेच अंगावर वार करुन त्याने खून केला. हा सर्व प्रकार घडत असताना समिना यांचे वडील घटनास्थळी होते. डोळ्यांसमोर हा प्रकार घडत असल्यामुळे समिना यांचे वडील आपल्या जावयाला पकडण्यासाठी गेले. मात्र आरोपीने समिनाचे वडील यांच्याही हातावर वार करून त्यांनाही जखमी केले. या हल्ल्यात पत्नी समिना नदाफ यांचा जागेवरच मृत्यू झाला असून त्यांचा पती इम्तियाज यास हुपरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हत्याचे नेमके कारण काय ?
गळा चिरून हत्या केल्यामुळे हातकणंगले येथे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केले असले तरी त्याने पत्नीची हत्या नेमकी का केली, असा प्रश्न विचारला जात आहे.










