पुणे – लग्न जुळवण्याच्या वेबसाईटवर ३४ वर्षीय संगणक अभियंता असलेल्या महिलेशी ओळख निर्माण करून त्यानंतर त्याला वाढदिवसाच्या पार्टीमध्ये बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुणेमधील हिंजवडी परिसरात घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एका ३४ वर्षीय व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे .
या प्रकरणात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लग्न जुळवण्याच्या वेबसाईटवर त्यांची ओळख झाली होती. आरोपीने लग्न करायचं आहे सांगत पीडितेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्यातील भेटीदेखील वाढल्या होत्या. २१ नोव्हेंबरला पीडित महिलेला आरोपीने आपल्या वाढदिवसाच्या पार्टीत बोलावले. पार्टी झाल्यानंतर ‘तू एकटी घरी जाऊ नकोस उशीर झाला आहे, उद्या सकाळी जा’ असे सांगून पीडितेला थांबवून घेतलं. दरम्यान, आरोपी पीडितेला घरी घेऊन गेला अन् तिथे बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले असं तक्रारीत म्हटलं आहे. तर, काही दिवसांनी पीडितेला आरोपीने विवस्त्र करून विनयभंग केला असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.
नंतर आरोपीने पीडित महिलेशी दुरावा निर्माण करत संपर्क तोडला. यामुळे आपल्याला लग्नाचं अमिष दाखवून बलात्कार झाल्याचं समजल्यानंतर महिला तणावात होती. पीडित महिलेने तणावातून बाहेर येताच आणि आरोपीचा संपर्क न झाल्याने हिंजवडी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली आहे. त्यानुसार ३४ वर्षीय आरोपीविरोधात विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा महिला पोलीस उपनिरीक्षक बोरकर अधिक तपास करत आहेत.












