नवी दिल्ली: केंद्र सरकारने सर्व राज्यांना पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना चिठ्ठी लिहून कोरोना चाचण्या कमी करू नका. चाचण्या वाढवा, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.
देशातील कोरोना रुग्णसंख्येचा ग्राफ गेल्या काही दिवसांपासून खाली येत आहे. गेल्या 24 तासात देशात 2.38 लाख नवे रुग्ण सापडले आहेत. रविवारच्या तुलनेत कालची रुग्णसंख्या 7.8 टक्क्यांनी कमी आहे. संसर्ग दरातही घट झाली आहे. सोमवारी पॉझिटिव्हीटी रेट 13.11 टक्के होता. हा रेट रविवारी 14. 78 टक्के होता.
दिल्ली आणि मुंबईतही आता कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. या दोन्ही ठिकाणी सर्वाधिक कोरोना रुग्ण होते. कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून या दोन्ही शहरांकडे पाहिले जात होते. मात्र, गेल्या दोनचार दिवसांपासून या दोन्ही शहरातील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली आहे.
इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नव्या गाईडलाईन्समुळे कोरोना रुग्णसंख्येत कमी झाल्याचं सांगितलं जात आहे. नव्या गाईडलाईननुसार पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आल्यानंतरही कोरोनाची टेस्ट करण्याची गरज नाही. संक्रमितांच्या संपर्कात आल्यानंतर केवळ 60 वर्षांवरील लोकांचीच टेस्ट केली जावी किंवा जे लोक गंभीर आजारी आहेत त्यांनीच टेस्ट करून घ्यावी. सरकारने ज्येष्ठ नागरिक आणि बुजुर्गांना हाय रिस्क कॅटेगिरीत ठेवलं आहे.
मुंबईत काल दिवसभरात 5 हजार 956 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील 4 हजार 944 रुग्णांना कुठलीही लक्षणं नाहीत. तर 479 जण काल रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसंच दिवसभरात 15 हजार 551 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईत काल 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे. या आकडेवारीनुसार मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 93 टक्के इतका आहे. तर रुग्णवाढीचा दर केवळ 1.22 टक्के आहे. मुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी 55 दिवसांवर गेला आहे.
देशाची राजधानी दिल्लीतही कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात दिल्लीत 12 हजार 527 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 16 जानेवारी रोजी दिल्लीत 18 हजार 286 कोरोना रुग्ण आढळून आले होते.