Aurangabad: जायकवाडी धरण क्षेत्रात पुन्हा गूढ आवाज, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, कारण नेमके काय?

375

औरंगाबादः आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ख्याती असलेल्या जायकवाडी धरण (Jayakwadi Dam) क्षेत्रात सोमवारी दुपारी अचानक मोठे गूढ आवाज आहे. पण हे आवाज नेमके कशाचे आहेत, याचे उत्तर प्रशासकीय अधिकाऱ्यांना देता आले नाही. मागील पाच वर्षात पैठण तालुक्यात अनेक वेळा भूगर्भातून गूढ आवाज आले. आवाजाचा तपास करण्यासाठी मागील वर्षी भूवैज्ञानिक येथे येऊन गेले, तरीही त्यावर अद्याप उत्तर मिळालेले नाही. यातच सोमवारी पुन्हा एकदा मोठा आवाज आल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

दोन वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाने शासनाला या आवाजाचे कारण शोधण्यासाठी पत्रव्यवहार केल्याने नागपूर येथील भारतीय भूवैज्ञानिक, संशोधन विभागातील वरिष्ठ वैज्ञानिक या आवाजाचे कारण शोधण्यासाठी आले. त्यांनी येथील खडक, मातीचे नमूनेही घेतले होते. मात्र त्या अहवालाचे पुढे काय झाले, हे कुणालाच माहिती नाही. आता सोमवारी धरण क्षेत्रातूनच भूगर्भातून आवाज आल्याने त्याचे संशोधन होणे आवश्यक झाले आहे.

पैठण परिसरात अशा प्रकारच्या आवाजाने नागरिकांमध्ये भीती निर्माण होते. भूकंप किंवा धरण फुटण्याची भीती वाटते, मात्र लवकरच या आवाजाचे रहस्य उघड केले जाईल. तरीही या आवाजाचा धरणाला कोणताही धोका नाही, असे पाटबंधारे विभागाचे अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.

पैठणमध्ये वर्षभरातून दोन ते तीन वेळेस तरी असे गूढ आवाज येतात. त्यामुळे भूकंप येतो की काय अशी भीती नागरिकांना वाटते. गंभीर बाब म्हणजे, जायकवाडी धरणाचे भूकंपमापक केंद्रही बंद आहे. या केंद्रात आवाजाची नोंद होत नसली तरीही हे केंद्र सुरु करण्याची मागणी माजी आमदार संजय वाघचौरे, नगरसेवक बजरंग लिंबोरे, जितू परदेशी, उमेश पंडुरे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here