Omicron: विलगीकरणातील रुग्णांच्या देवदर्शनाने ओमायक्रॉनचा ‘प्रसाद’

568

उल्हासनगर : केनियावरून परतलेल्या चौघांपैकी तिघांना ओमायक्रॉन झाल्याचे उघड झाले असून त्यापैकी दोघेजण विलगीकरणात असतानाही देवदर्शन यात्रा करून आले. यात्रेदरम्यान त्यांनी शेकडो जणांना ओमायक्रॉनचा ‘प्रसाद’ दिल्याने महापालिकेने त्यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगर कॅम्प नं. ४ परिसरात राहणारे कल्याणी कुटुंबातील चौघेजण १७ डिसेंबर रोजी केनियातून परत आले. महापालिका आरोग्य विभागाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर, २१ डिसेंबर रोजी त्यांची आरटीपीसीआर चाचणी केली. चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत त्यांना घरातच विलगीकरणात राहण्यास बजाविले. मात्र, या कुटुंबाने महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवत ते देवदर्शन व सहलीसाठी काश्मीर, वैष्णोदेवी आणि अमृतसर येथे गेले. दरम्यान, चौघांपैकी तिघांचा आरटीपीसीआर चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. 

शहरात ओमायक्रॉन रुग्ण आढळल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाचे पथक कल्याणी यांच्या घरी त्यांना क्वारंटाइन करण्यासाठी गेले असता, ते कुटुंब सहलीसाठी गेल्याचे उघड झाले. याचा आरोग्य यंत्रणेला धक्का बसला असून ओमायक्रॉन पॉझिटिव्ह रुग्णांनी प्रवासादरम्यान किती जणांना प्रसाद दिला, असा प्रश्न उभा ठाकला आहे.

आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांच्या आदेशानंतर सहायक आयुक्त अजित गोवारी यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर, पोलिसांनी कल्याणी कुटुंबातील दोघांवर गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर सुरुवातीला रुग्णालयात, तर आता घरी उपचार करण्यात येत आहेत.

महापालिका आरोग्य विभागाने कल्याणी कुटुंबाला फोन करून, जेथे आहात तेथेच क्वारंटाइन होण्यास सांगितले. मात्र, हे कुटुंब सर्वत्र फिरत होते. ३१ डिसेंबर रोजी हे कुटुंब उल्हासनगरला आल्यानंतर, कोरोना आणि ओमायक्रॉनच्या नियम व अटींचा भंग केल्याचा ठपका महापालिका आरोग्य विभागाने ठेवला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here