नाशिक : नाशिकमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पहायला मिळत आहेत. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. नाशिक शहरात 1 जानेवारीला केवळ 88 रुग्ण बाधित होते. मात्र 5 जानेवारीला कोरोनाबाधितांची संख्या वाढून ती तब्बल 1 हजार 129 वर पोहोचली आहे. गेल्या चार दिवसांमध्ये हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले असून, पॉझिटिव्हिटी रेटमध्ये दहा टक्क्यांची वाढ झाली आहे.
कोरोना रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विशेष उपयायोजना आखण्यात येत आहेत. तसेच निर्बंधांमध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. ऑक्सिजनचा साठा, बेड्सची संख्या आणि नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबत जिल्हा प्रशासन विशेष खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण वाढत असून, नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन पालकमंत्री छगन भूजबळ यांनी केले आहे.
दरम्यान नाशिकमध्ये जवळपास 8 हजार बेड्स उपलब्ध आहेत. ऑक्सिजनचा साठा 400 मेट्रिक टन एवढा आहे. तर चाचणी किट देखील पुरेश्या प्रमाणात उपलब्ध आहे. या सोबतच 20 टक्के बेड्स राखीव ठेवण्याच्या सूचना देखील खासगी रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा देखील सज्ज असून, नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी केलय. एकीकडे नाशिक प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे नागरिक कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करत असल्याचे चित्र आहे.







