बुल्लीबाई अ‍ॅपमागे १८ वर्षांची तरुणी; ‘ते’ फोटो तिनेच अपलोड केल्याचे पुरावेही

बुल्लीबाई अ‍ॅपमागे १८ वर्षांची तरुणी; ‘ते’ फोटो तिनेच अपलोड केल्याचे पुरावेही

नवी दिल्ली: बुल्लीबाई अ‍ॅप प्रकरणी मुंबई पोलिसांनी उत्तराखंड येथून १८ वर्षीय श्वेता सिंह या तरुणीला ताब्यात घेतले आहे. रुद्रपूर येथे तिच्या ट्रांझिट रिमांडची प्रक्रिया सुरू असून त्यानंतर तिला मुंबईत नेण्यात येणार आहे. ही तरुणी या संपूर्ण कारस्थानामागील मास्टरमाइंड असल्याचा पोलिसांचा संशय असून तिच्या चौकशीतून अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, याप्रकरणी विशालकुमार या सिव्हिल इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला बेंगळुरू येथून अटक करण्यात आली असून त्याला मुंबईतील कोर्टात हजर करण्यात आले असता १० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विशालकुमार हा श्वेताचा मित्र असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

आता बुल्लीबाई; हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या…

श्वेता सिंह ही उत्तराखंडमधील रुद्रपूर येथील आहे. ती बारावी उत्तीर्ण झाली असून पुढील शिक्षण सुरू आहे. बुल्लीबाई अ‍ॅप प्रकरणात श्वेता मुख्य आरोपी असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या अ‍ॅपवर श्वेताने मुस्लिम महिलांचे फोटो अपलोड केल्याचे पुरावेही पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगण्यात येत आहे. श्वेता आणि विशालकुमार हे दोघे एकमेकांच्या सपर्कात होते. त्यामुळे श्वेताला मुंबईत नेऊन दोघांची समोरासमोर चौकशी केली जाणार आहे. त्यातून या प्रकरणात अधिक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे.

‘बुल्लीबाई’ प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; इंजिनीअरिंगचा विद्यार्थी…

काय आहे नेमकं प्रकरण?

बुल्लीबाई अ‍ॅपच्या माध्यमातून सोशल मीडियात सक्रिय असलेल्या १०० महिलांना टार्गेट करण्यात आले. त्यांचे आक्षेपार्ह फोटो टाकून त्यावर बोली लावली गेली. हा धक्कादायक प्रकार समोर येताच मोठं वादळ उठलं. एका पीडित महिला पत्रकाराने याबाबत दिल्लीत तक्रार केली. तिथे गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मुंबईतही पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. संबंधित युजरला ब्लॉक करून हे अ‍ॅप हटवण्यात आले आहे. त्याचवेळी याप्रकरणी आता तपासालाही वेग आला आहे. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता असल्याने त्यादिशेनेही तपास केला जात आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केले असावे असाही अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here