एकाच आठवड्यातील दुसरी मोठी कारवाई
कर्जत आणि दौंड महसुल विभागाच्या संयुक्त कारवाईत भीमानदी पात्रातून १४ अवैध व विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या बोटीना जलसमाधी देण्यात आली यामध्ये कर्जत तालुका हद्दीतील ६ आणि दौंड तालुक्यातील ८ यांत्रिक बोटीचा समावेश होता.असल्याची माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली.
गुरुवार, दि ३० रोजी पहाटे चारच्या सुमारास कर्जत प्रांताधिकारी डॉ अजित थोरबोले, तहसीलदार नानासाहेब आगळे आणि दौंड तहसीलदार यांना कर्जत तालुक्यातील गणेशवाडी, दुधोडी, खेड तर दौंड तालुक्यातील मलठण, वाटलूज व सिरापूर याठिकाणी भीमानदी पात्रातील १४ यांत्रिक बोटीद्वारे अवैध – विनापरवाना वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाली. तिन्ही प्रमुख अधिकाऱ्यानी तात्काळ दोन्ही तालुक्याचे संयुक्त पथक तयार करीत वरील ठिकाणी धाड टाकली.
यावेळी सदर पथकास कर्जत तालुका हद्दीत ६ यांत्रिक बोटी तर दौंड तालुक्यातील ८ अशा एकूण १४ बोटीच्या साह्याने वाळू उपसा करताना आढळल्या. यावेळी कर्जत आणि दौंडच्या तहसीलदारानी या बोटींना जलसमाधी देत नष्ट केल्या. सदरची कारवाई तब्बल १२ तास चालली होती. सदर पथकात कर्जत तहसीलदार नानासाहेब आगळे, मंडळ अधिकारी परमेश्वर पाचारने, तलाठी आनंद कोकाटे, सुनील हसबे, धुळाजी केसकर, रवी लोखंडे, गणेश सोनवणे, विश्वास राठोड, अभिजित शेलार, विकास मोराळे, दीपक बिरुटे, कोतवाल भाऊसाहेब शिंदे, पोलीस पाटील दादासाहेब भोसले आदी सहभागी झाले होते.
एकाच आठवड्यातील दुसरी कारवाई
दोन दिवसांपूर्वीच खेड (ता.कर्जत) भागात अवैध वाळू वाहतूक करताना एक टीपर मिळून आला होता त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. गुरुवारी तब्बल भिमानदी पात्रात १२ तास विक्रमी कारवाई करीत अवैध-विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या एकूण १४ यांत्रिक बोटींना जलसमाधी देण्यात आली असल्याने एकाच आठवड्यात महसुलची दुसरी कारवाई यशस्वी पार झाली.






