महाड: महिला सरपंचाच्या हत्येचा गुंता सुटला, 30 वर्षीय व्यक्तीला अटक; बलात्काराचाही गुन्हा दाखल
महाड: महाड तालुक्यातील एका गावातील महिला सरपंचाची सोमवार (27 डिसेंबर) दुपारी हत्या झाली होती.
यावेळी महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत मृतदेह सापडला होता. या प्रकरणी महाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर महाड तालुका पोलिसांनी नऊ टीम तयार करुन या प्रकरणाचा तपास सुरु केला.यावेळी पोलिसांनी डॉग स्कॉडची देखील मदत घेतली. जी अत्यंत महत्वपूर्ण ठरली. त्याच आधारे पोलिसांनी अमिर शंकर जाधव (वय 30 वर्ष) याला महाडमधील उवटआळी येथून अटक केली आहे.
महाडचे उप विभागीय पोलिस अधिकारी निलेश तांबे यांनी याबाबत पत्रकार परीषद घेऊन माहिती दिली. पूर्वीच्या भांडणाचा राग धरून आरोपीने महिलेची हत्या केल्याची कबुली दिली असल्याचं यावेळी पोलिसांनी सांगितलं आहे.सदर प्रकरणी दाखल गुन्ह्यात भारतीय दंड संहिता कलम 376 म्हणजे बलात्काराचा आरोप देखील आरोपीवर दाखल करण्यात आला आहे.
महाड तालुक्यातील एका गावच्या 42 वर्षीय सरपंच महिलेची निघृर्ण हत्या करुन तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत जंगलात टाकून दिल्याची घटना उघडकीस आली होती.तुडील-भेलोशी रस्त्यालगत आदीस्ते गावच्या उबटआळी रस्त्यालगत सोमवारी दुपारी जंगलात सदर महिला लाकडं आणण्यासाठी गेली असता ही घटना घडली होती.
गावातील एक तरुण महाडकडे येत असताना रस्त्यालगत लाकडांची मोळी अस्त्यावस्त दिसून आली. पण आजूबाजूला कोणीही दिसलं नाही. त्यामुळे तरुणाला काहीसा संशय आला.यामुळे सदर तरुणाने परिसरात आजूबाजूला पाहिल्यानंतर त्याला रस्त्यालगत जंगल भागात एक महिला गंभीर जखमी अवस्थेत दिसून आली.
अज्ञात इसमाने डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करुन तिची हत्या केली असल्याचं यावेळी उघड झालं होतं. तसंच संबंधित महिलेचा मृतदेह विवस्त्र असल्याने तिच्यावर अतिप्रसंग अथवा बलात्कार झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता.महिलेचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडल्यामुळे हत्येपूर्वी महिलेवर लैंगिक अत्याचार झाले असण्याची किंवा तसा प्रयत्न झाला असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात होता. त्यामुळे त्याच दृष्टीने पोलिसांनी तपास सुरु केला होता.
अखेर गावकऱ्यांची चौकशी केल्यानंतर आणि डॉग स्क्वॉडकडून मिळालेल्या पुराव्यानंतर आरोपी अमिर याला अटक करण्यात आली. सध्या पोलीस त्याची कसून चौकशी करत आहे.