एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच; जळगाव विभागात 22 कर्मचारी बडतर्फ

445

जळगाव : एसटी कामगारांचा संप चिरघळताना दिसून येत आहे. संपाची मुदत संपून देखील कामावर न येणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर आता प्रशासनाकडून बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. जळगाव विभागामध्ये मंगळवारी 22 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. यामध्ये जळगाव आगारातील 8 तर भुसावळ आगारातील 14 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, अशी माहिती विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांच्या वतीने देण्यात आली आहे.

एसटी महामंडळाचे  राज्य शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून राज्यासह जळगाव जिल्ह्यात एस.टी. कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन सुरू आहे. राज्य शासनाकडून कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र तरीही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. बस कर्मचारी कामावर येत नसल्याने एसटीची सेवा ठप्प झाली आहे. कारवाईच्या इशाऱ्यानंतर जळगाव आगारातील 35 चालक आणि 35 वाहक कामावर रुजू झाले असून, काही मार्गावरील बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत जळगाव विभागातील एकूण 350 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र तरी देखील अद्यापही कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनिकरण करून, एसटी कर्मचाऱ्यांना क वर्गाचा दर्जा द्यावा, ही त्यांची मुख्य मागणी आहे. सोबतच वेतनवाढ करावी, थकित वेतन मिळावे, महागाई भत्ता आणि घर भाडे भत्त्यात वाढ करावी अशा विविध मागण्या त्यांनी केल्या आहेत. यातील अनेक मागण्या आतापर्यंत राज्य सरकारकडून मान्य करण्यात आल्या आहेत. मात्र तरीदेखील एसटी कर्मचारी अद्यापही संप मागे घेण्यास तयार नसून, ते विलिनिकरणाच्या मुद्द्यावरच अडून बसले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here