- पुणे : भारतीय हवामान विभागाच्यावतीनं राज्यात ऐन थंडीच्या दिवसात आज ( 28 डिसेंबर) आणि उद्या (29 डिसेंबर) पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मध्य भारतावर ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्सचा (WD) प्रभाव पडण्याची दाट शक्यता असल्यानं महाराष्ट्रात आज आणि उद्या मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आणि काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आयएमडीनं विदर्भातील काही जिल्ह्यांन ऑरेंज ॲलर्टतर काही जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी केला आहे.
- हवामान विभागाकडून विदर्भ आणि मराठवाड्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. जालना, परभणी, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, गडचिरोली, गोंदिया, नागपूर,वर्धा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो.
- हवामान विभागानं आज आणि उद्यासाठी ॲलर्ट जारी केले आहेत. राज्यात 28 डिसेंबरला औरंगाबाद, जालना आणि गोंदिया जिल्ह्याला यलो ॲलर्ट देण्यात आलाय. तर, अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आलाय. जळगाव, परभणी, हिंगोली, नाशिक, नांदेड, धुळे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.
- नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट देण्यात आलाय. तर चंद्रपूरला यलो अॅलर्ट देण्यात आलाय. नांदेड, हिंगोली, परभणी आणि जालना, औरंगबाद जिल्ह्यात पाऊस होऊ शकतो.
- नागपूर विमानतळावरुन सकाळी उडणारे विमानं धुक्यामुळे थांबले. व्हिजीबीलीटी कमी असल्याने विमान उड्डाणावर परिणाम झाला. शहरात सकाळी धुक्याची चादर असल्याने वाहन चालवताना अडचणी निर्माण झाल्या होत्या. नागपुरात गेले दोन दिवस थंडी कमी झालीय. कमाल तापमान 14.4 अंश सेल्सिअसवर गेलंय.






