पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून दहावीचे परीक्षा अर्ज भरण्यास आणखी एकदा मुदतवाढ देण्यात आलीय. दहावीच्या बोर्ड परीक्षांचे (10th Exam Form) ऑनलाईन अर्ज (Online Application) भरण्यास शाळांना मुदतवाढ देण्यात आली आहे. नियमित शुल्कांसह 26 डिसेंबरपर्यंत परीक्षा अर्ज भरता येणार आहे. तर 1 जानेवारीपर्यंत विलंब शुल्कासह परीक्षेचा अर्ज भरता येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून (Education Department) देण्यात आली आहे. राज्याच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डानं हे परिपत्रक काढलं आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता विलंब शुल्कासह 1 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. यापूर्वी नियमित शुल्कासह 20 डिसेंबरपर्यंत, तर विलंब शुल्कासह 28 डिसेंबरपर्यंत मुदत होती. आता विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह 26 डिसेंबरपर्यंत तर विलंब शुल्कासह 27 डिसेंबर ते 1 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
2022 मध्ये होणाऱ्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज भरून घेण्यास मुदतवाढ दिल्याचे आदेश शाळांना देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा परिपत्रक काढत ही माहिती दिली आहे.
बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान पार पडणार आहेत. तर त्यानंतर दहावीच्या परीक्षांना सुरूवात होणार आहे. दहावीच्या परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिलदरम्यान पार पडणार आहेत. 14 फ्रेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत बारावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दहावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत.
ओमिक्रॉनसंदर्भात राज्य शासन खबरदारी घेत आहे. त्याबाबत राज्य सरकारने काही नियमही लागू केले आहेत. या नियमांचे पालन करून दहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाईन पार पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले होतं.







