अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची गळा कापून निर्घृण हत्या,नंतर दगडाने ठेचून चेहरा केला विद्रुप. हिमायतबागेत सापडला मृतदेह, एकजण ताब्यात;

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची गळा कापून निर्घृण हत्या,नंतर दगडाने ठेचून चेहरा केला विद्रुप .हिमायतबागेत सापडला मृतदेह, एकजण ताब्यात;
औरंगाबाद : १७ डिसें.२०२१

एमआयटी महाविद्यालयात अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.१६) दुपारी उघडकीस आली. विद्यार्थ्याचा गळा चिरून, चेहरा दगडाने ठेचून विद्रुप करण्यात आला होता. कृष्णा शेषराव जाधव (२२, रा. सुभाषचंद्र बोस नगर, टीव्ही सेंटर, हडको) असे मृताचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी आज सकाळी याप्रकरणी आनंद टेकाळे यास वाळूज येथून ताब्यात घेतले आहे. 
बेगमपुरा पोलीस ठाण्यात मृताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कृष्णा बुधवारी रात्री ९ वाजता १५ ते २० मिनिटात बाहेरून जाऊन येतो म्हणून बुलेटवरून (एमएच २० एफएक्स ०५१२) घराबाहेर पडला़. त्याचा मोबाइल हरवला असल्यामुळे त्याने मोठ्या बहिणीचा मोबाइल सोबत नेला होता. तेथून तो मित्रांकडे गेला़ रात्री ११ वाजता त्यास संपर्क साधला असता त्याने मित्राचा वाढदिवस आहे, अर्ध्या तासाने येतो असे सांगितले. वडिलांनी ११.३० वाजता पुन्हा फोन केला तेव्हा त्याने एमजीएमजवळील हॉटेलमध्ये आहे, १५ ते २० मिनिटात येतो असे सांगितले. १२ वाजता त्याचा फोन बंद येत होता. वडिलांनी १२.३० वाजता सिडको पोलीस ठाण्यात जाऊन त्यांच्या मिसिंगची तक्रारही दाखल केली. त्यांचे मित्र व नातेवाइकांकडे चौकशी केली. रात्रभर शोधूनही त्याचा पत्ता लागला नाही़. गुरुवारी दुपारी हिमायतबागेत फिरणाऱ्यांना रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह दिसला. बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार, उपनिरीक्षक विशाल बोडखे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी तत्काळ ठसे, श्वानपथकालाही पाचारण केले. पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, उपायुक्त उज्ज्वला वनकर, सहायक आयुक्त अशोक थोरात, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके आदींनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत कृष्णाची बहीण आणि वडिलांनी आयफोनवरील क्लाऊड ॲप ॲक्टिव्हेट करून लोकेशनचा शोध घेतला असता, हिमायतबागेचे लोकेशन दिसले. त्या लोकेशनवर कुटुंबातील सदस्य आल्यानंतर तेथे पोलिसांचा फाैजफाटा दिसला. ताेपर्यंत मृतदेह घाटी रुग्णालयात दाखल केला होता. घाटीत जाऊन मृतदेहाची ओळख पटविण्यात आली. कृष्णाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला. उपनिरीक्षक विशाल बोडखे पुढील तपास करत आहेत.

घटनास्थळावर बघ्यांची गर्दी
तरुणाचा मृतदेह आढळल्याची वार्ता वेगाने परिसरात पसरली. बघ्यांनी हिमायत बागेत गर्दी केली होती.

अन् बहिणीने हंबरडा फोडला
शेषराव जाधव यांचे टीव्ही सेंटर येथे चष्म्याचे दुकान आहे. त्यांना २६ वर्षांची मोठी मुलगी, २२ वर्षांचा कृष्णा आणि १४ वर्षांचा एक मुलगा आहे. बहिणीने आयफोनमधील तंत्रज्ञानाच्या आधारे लोकेशन शोधून काढले होते. त्यामुळे घटनास्थळी वडिलांसोबत तिच्यासह लहान भाऊ आला होता. भावाचा खून झाल्याचे समजताच तिने हंबरडा फोडला तेव्हा तिचे उपायुक्त गिते आणि वनकर यांनी सांत्वन केले.

एकजण ताब्यात; एकाला सोडले
पलिसांनी कृष्णाच्या मित्रापैकी एकाला ताब्यात घेतले होते. चौकशी केल्यानंतर त्याचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सोडून देण्यात आले. दरम्यान, तपासात आनंद टेकाळे याचे नाव पुढे आले होते. तो फरार झाला होता. आज सकाळी आनंद टेकाळेस गुन्हे शाखा आणि बेगमपुरा पोलिसांनी वाळूज येथून अटक केली आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here