कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण नको – विजय वडेट्टीवार
मुंबई – मराठा समाजाला ईडब्ल्यूएसमधून आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला. याला सर्वांनी पाठिंबा दर्शवला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, ओबीसींच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण नको, ही आमची भूमिका कायम राहील. राज्यात 52 टक्के ओबीसी समाज आहे. त्याचा विचार होणेही गरजेचे आहे, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी घेतली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते.
वडेट्टीवार म्हणाले, ओबीसी आरक्षण 27 टक्के आहे. भटक्या विमुक्त जमातींना 8 टक्के आरक्षण आहे. यामुळे 19 टक्के आरक्षणात मराठा समाजाला 12 टक्के आरक्षण देता येणार नाही. तसेच ओबीसींचे नुकसान नको, असे म्हणत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांच्या मताशीही आपण असहमत असल्याचे त्यांनी सांगितले.
ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण नको, अशी आमची आग्रही मागणी आहे. यासंदर्भात नुकतीच मंत्रिमंडळाची बैठकही झाली. या बैठकीत छगन भुजबळ आणि वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यावेळी बोलताना, मंत्रीमंडळाच्या बैठकीतील विषय बाहेर बोलायचे नाहीत, पण ओबीसी विषयावर कायमच बोलत आलो आहे, असेही वडेट्टिवार म्हणाले.




