मोकाट बैलांच्या भांडणात तरुणाचा जीव गेला, नगर परिषदेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश
राजस्थानातील मोकाट जनावरांच्या प्रश्नावर तिथले न्यायालय अत्यंत कठोर झाले आहे. बुंदी इथल्या न्यायालयाने मोकाट जनावरांमुळे झालेल्या नुकसानीच्या प्रकरणात आदेश देताना कठोर निर्णय घेतला आहे.न्यायालयाने बुंदी येथील नगर परिषदेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.2018 साली बुंदी येथे मोकाट बैलांच्या झुंजीत एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या तरुणाचा कुटुंबीयांनी न्यायालयात नुकसानभरपाई मिळावी यासाठी दावा केला होता. त्यांच्या दाव्यावर निकाल देताना न्यायालयाने बुंदी नगर परिषदेला या कुटुंबाला 23 लाख 62 हजार 500 रुपये देण्याचे आदेश दिले होते. या आदेशांची पूर्तता करण्यात आली नव्हती. नगर परिषदेने आदेशांचे पालन न करत अवमान केल्याने न्यायालय संतापले आहे. न्यायालयाने नगर परिषदेची संपत्ती जप्त करून तरुणाच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.संपत्ती जप्तीचा आदेश गुरुवारी नगर परिषदेला अधिकृतरित्या कळवण्यात आला. नगर परिषदेच्या आयुक्तांना आदेशाची प्रत देण्यात आली आहे. न्यायालयाने मुकेश दिक्षीत याच्या मृत्यूनंतर त्याच्या घरच्यांना 23 लाख 62 हजार 500 रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले होते. 6 टक्के व्याजासह ही रक्कम द्यावी असं आदेशात म्हटलं आहे. व्याजाची रक्कम मिळून दिक्षीत कुटुंबीयांना 26 लाख 60 हजार रुपये मिळणं अपेक्षित आहे. 5 जानेवारी 2022 पर्यंत दिक्षीत कुटुंबियांना नुकसानभरपाई मिळाली नाही, तर न्यायालय नगर परिषदेची संपत्ती विकून रक्कम जमा करण्याचे काम सुरू करेल अशी ताकीद न्यायालयाने दिली आहे.






