नाशिक जिल्ह्यातल्या आडगांवच्या आर. के. ज्वेलर्स या दुकानावर दरोडा घालत असतांना पोलिसांवर गोळीबार करुन फरार झालेला सराईत व फरार गुन्हेगार सुनिलसिंग जितसिंग जुनी {रा.संजयनगर, काटवन खंडोबा, अ. नगर} याला पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.
नगर एलसीबीच्या स्वतंत्र पथकानं ही कामगिरी केलीय. हा फरार गुन्हेगार मनमाडहून नगरला येत असल्याची माहिती एलसीबीचे पो. नि. अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार पोलिसांनी नगर – मनमाड महामार्गालगतच्या निंबळक बायपास येथे दि. १३ रोजी वाहन तपासणीची मोहिम राबविली.
या मोहिमेत पोलिसांना तवेरा कार येत असल्याचे दिसले. गतिरोधकामुळे कारची गती कमी झाली आणि अंधाराचा फायदा घेत दोघे पळून गेले. मात्र सुनिलसिंग जुनी हा पोलिसांच्या हाती लागला. पोलिसांनी त्याला पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या हवाली केलं.
नाशिक विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानं एलसीबीचे पो. नि. कटके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, सहाय्यक फौजदार राजेंद्र वाघ, सहाय्यक फौजदार विजय खंडागळे, पो. काँ. बापू फोलाने, पोलीस नाईक भीमराज खर्से, पोलीस नाईक देवेंद्र शेलार आदींनी ही कामगिरी पार पाडली.
नाव बदलून नगरमध्ये वास्तव्य !
अनेक गुन्ह्यात फरार असलेला आणि नगर त्याचप्रमाणं नाशिक पोलिसांच्या रडारवर असलेला सराईत गुन्हेगार सुनिलसिंग जुनी हा वेषांतर करुन आणि नाव बदलून काटवन खंडोबा येथे असलेल्या संजयनगर झोपडपट्टी येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सराईत आणि फरार गुन्हेगार सुनिलसिंग जुनी याला अटक केली.