बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी महिला पोलीस उपनिरीक्षकाने घेतली लाच

.बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी महिला पोलीस उपनिरीक्षकाने घेतली लाच

पुणे: पुणे परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून चक्क बलात्काराचा गुन्हा न नोंदवण्यासाठी एका महिला पोलीस उपनिरीक्षकाने लाच घेतल्याचे गंभीर प्रकार समोर आले आहे. आरोपी महिला पोलीस उपनिरीक्षक हेमा साळुंके यांना एसीबीने ताब्यात घेतलं आहे याच प्रकरणातील दुसरा आरोपी पोलीस कर्मचारी अशोक बाळकृष्ण देसाई हा एसीबीच्या कर्मचाऱ्यांना धक्का देऊन पळून गेला आहे. दोघांनी एकूण १ लाख लाच मागितली होती मात्र तडजोडअंती ७० हजार घेत असताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्यात ४२ वर्षीय व्यक्ती विरोधात अर्ज आला होता. त्यात त्यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याबाबत मागणी करण्यात आली होती. त्याचा तपास महिला पोलीस उपनिरीक्षक हेमा साळुंके या करत होत्या. बलात्काराचा गुन्हा दाखल न करण्यासाठी हेमा साळुंके आणि पोलीस कर्मचारी देसाई यांनी एक लाखांची लाच तक्रारदार यांच्याकडे मागितली होती. तडजोडअंती सत्तर हजार द्यायचं ठरलं. तक्रारदार यांनी एसीबीशी संपर्क साधून सात दिवसांपूर्वी लाचखोरीच्या या प्रकाराबद्दल विभागाला माहिती दिली. गुरुवारी दुपारच्या सुमारास एसीबीने तक्रारदारकडून देसाई हे लाच घेत असताना रंगेहाथ पकडले मात्र ते एसीबी या कर्मचाऱ्यांना धक्का देऊन पसार झाले.महिला पोलीस उपनिरीक्षक हेमा साळुंके यांच्या सांगण्यावरून पोलीस कर्मचारी देसाई यांनी तक्रारदार यांच्याशी संपर्क केला असल्याचं आणि लाच मागीतल्याच स्पष्ट झालं असून सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक सीमा आडनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here