चाणक्य समजणाऱ्यांना मात देणारे चाणक्य म्हणजे पवारसाहेब, सर्वांना घेऊनच आघाडी होणार : नवाब मलिक

549

मुंबई : आम्ही ममतादीदी सोबत राहणार की कॉंग्रेससोबत राहणार याची चिंता काहींना वाटतेय. परंतु जे स्वतःला चाणक्य समजत होते त्यांना मात देणारे पवारसाहेब चाणक्य आहेत हे लक्षात घ्यावे, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले आहे. या राज्यात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन पक्ष एकत्र येतील असे कधी कुणी स्वप्नातही पाहिले नव्हते. तशीच परिस्थिती या देशात होणार आहे असेही मलिक यांनी सांगितले.

बरेच लोक आहेत जे कधी सोबत येणार याची चर्चा होत नाही. परंतु या सगळ्यांची मोट बांधण्याचे काम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार करतील. कुणालाही याच्यातून बाहेर काढून ही आघाडी होणार नाही. सगळ्यांचा समावेश करायचा आहे. यादृष्टीने शऱद पवार काम करत आहेत, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

या देशात विविध प्रश्न निर्माण झाल्यावर ज्यापध्दतीने युपीएच्या बैठका झाल्या पाहिजे होत्या त्या झाल्या नाहीत, ही सत्य परिस्थिती आहे. आम्हाला या देशात ममतादीदी, टीआरएस, सपा, आरजेडी, दक्षिणेतील पक्ष या सर्वांची मोट बांधायची आहे. कॉंग्रेससह एक नवीन आघाडी तयार करायची आहे. सामूहिक नेतृत्व निर्माण करुन ही आघाडी काम करेल, असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

ममता बॅनर्जी या दोन दिवसाच्या दौर्‍यावर असताना त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी आमच्या मंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी देशात मोदी सरकारच्या विरोधात असंतोषाचे वातावरण असून सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक नवीन पर्याय देण्याची गरज असल्याचे मत मांडले. त्यावर पवारसाहेबांनी आम्ही सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे, असेदेखील मलिक यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here