एसटी महामंडळाकडून पगारवाढीचे परिपत्रक जारी

446

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे या मुख्य मागणीला घेऊन एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरुच आहे. राज्य सरकारने पगारवाढ दिलेली असली तरी अजूनही हे आंदोलन सुरुच आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. नोव्हेंबर महिन्यापासून ही वेतनवाढ लागू करण्यात आलीय. पगारवाढीचे हे परिपत्रक व्यवस्थापकीय संचालकांनी काढले आहे. मात्र कर्तव्यावर हजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच ही वेतनवाढ मिळणार आहे.

परिपत्रकात नमूद केल्याप्रमाणे 1 नोव्हेंबर पासून कर्तव्यावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांनाच 10 डिसेंबर रोजी हजर दिवसाचे वेतन नवीन वेतनवाढीप्रमाणे दिले जाणार आहे. हे परिपत्रक राज्यातील विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहे. यामध्ये 31 ऑक्टोबर 2021 रोजी पर्यंत 10 वर्षाचा कालावधी पूर्ण होत असल्यास किंवा 10 वर्षाच्या आतील कर्मचारी अधिकाऱ्यांना 5 हजार रुपयांची वेतनवाढ दिली जाणार आहे. तर 10 ते 20 आणि 20 वर्षांवरील सेवा देणाऱ्यांची सेवा 32 ऑक्टोबरपर्यंत मोजण्यात येणार असून, घोषित वेतनवाढीप्रमाणे त्यांना लाभ दिला जाणार आहे.

सेवा कालावधी – वेतनवाढीचा फरक

10 वर्षे  – 5 हजार

10 ते 20 वर्ष – 4 हजार

20 ते पुढील सेवा – 2 हजार 500

दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरुच असल्यामुळे राज्य सरकारने कडक पवित्रा घेतलेला आहे. सध्या आंदोलन मागे घ्या. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करता येईल, असे आवाहन परिवहन विभागाचे मंत्री अनिल परब यांनी केलेले आहे. मात्र जोपर्यंत एसटी महामंडळाचे विलीनीकरण होणार नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलाय. तर दुसरीकडे कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले नाही तर सेवा समाप्ती तसेच निलंबनाची कारवाई कठोरपणे करण्यात येत आहे. राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या निलंबनाची कारवाई सुरुच आहे. आज रोजी राज्यभरात 498 एसटी कर्मचाऱ्यांनी निलंबित करण्यात आलंय. हा आकडा आता 9 हजार 141 वर पोहोचलाय. तर आज एकूण 36 जणांच्या सेवा समाप्तीचा निर्णय घेण्यात आलाय. आतापर्यंत 1 हजार 928 जणांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here