Gautam Adani is Richest Man : गेल्या दोन वर्षामध्ये गौतम अदानींच्या ( Gautam Adani) संपत्तीत वेगाने वाढ झाल्याचं पहायला मिळतंय. ती इतकी वाढलीय की आता गौतम अदानींनी संपत्तीच्या बाबतीत मुकेश अबांनींना ( Mukesh Ambani) मागे सारत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे. बुधवारी शेअर मार्केटमध्ये अदानी समूहाच्या शेअर्समध्ये तेजी आल्याने, त्याचवेळी रिलायन्सच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याने गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत.
सौदी अरबच्या अरामको सोबतची डील रद्द झाल्याचा रिलायन्सला फटकासौदी अरबच्या अरामको या कंपनीसोबत रिलायन्सची एक मोठी डील होणार होती. पण ही डील आता रद्द झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर रिलायन्सच्या शेअर्समध्ये सलग तिसऱ्या दिवशी मोठी घट झाल्याचं पहायला मिळतंय. याचा फटका रिलायन्स इंडस्ट्रिजला झाला असून त्यांच्या महसुलात मोठी घट झाली आहे. आज रिलायन्सच्या शेअर्समध्ये 1.44 टक्क्यांची घट होऊन तो 2351.40 रुपयांवर बंद झाला आहे.
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी वाढअदानी समूहाच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये 4.63 टक्क्यांची वाढ होऊन तो 763 रुपयांवर पोहोचला आहे. अदानी एंटरप्राईजच्या शेअर्समध्ये 2.08 टक्क्यांची वाढ होऊन तो 1742 रुपयांवर पोहोचला आहे. अदानी समूहाच्या एकूण सहा कंपन्या लिस्टेड आहेत.
गेल्या वर्षाचा विचार करता गौतम अदानींच्या संपत्तीत 55 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे तर मुकेश अंबानींच्या संपत्तीत केवळ 14.3 अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. गौतम अदानींची संपत्ती गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 261 टक्क्यांनी वाढली आहे. अदानींची संपत्ती ही 1,40,200 कोटींवरुन 5,05,900 कोटींवर गेली आहे. गेल्या एकाच वर्षात त्यांच्या संपत्तीत 3,65,700 कोटींची भर पडली आहे.





