राज्यात पहिली ते चौथी शाळा सुरु होणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य

464

Maharashtra School Opening : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालल्यानंतर हळूहळू सर्व गोष्टींमध्ये शिथिलता येत आहे. महाविद्यालयं, पाचवी ते दहावी शाळा सुरु झाल्यानंतर आता पहिली ते चौथी शाळा सुरु होणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. टोपे म्हणाले की,  पहिली ते चौथी सर्व विद्यार्थी शाळेत आले पाहिजेत.  त्यांचे लसीकरण केले पाहिजे. 12 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करावे हा मुद्दा मांडला गेला आहे. पहिली ते चौथी शाळा सुरु करायला परवानगी द्यावी असंही म्हटलं आहे. उद्या कॅबिनेट आहे, या बैठकीत अंतिम निर्णय होईल, असं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने ना हरकत दिली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. 

राजेश टोपे म्हणाले की, नाट्यगृह, सिनेमागृहांना आता 50% परवानगी दिली आहे.  ही परिस्थिती सुधारली तर निर्बंधांबाबत सकारात्मक विचार करता येईल. त्यावरही मुख्यमंत्री निर्णय घेतील. त्यांनी म्हटलं की, सध्या लग्नसराईमुळं गर्दी वाढत आहे. यात सोशल डिस्टन्स दिसत नाही.  बिनधास्तपणा जाणवतोय.  ही मानसिकता घातक आहे.  जागरूक राहिले पाहिजे.  दुसऱ्या लाटेत आपले नुकसान झाले आहे, असंही टोपे म्हणाले. 

टोपे म्हणाले की, राज्यात आता 700 ते 800 रुग्ण सापडत आहेत. बरे होण्याचे प्रमाण 98 टक्के आहे. मुले आजारी पडल्याचं प्रमाण जास्त नाही.  पालकांनी चिंता करण्याचं कारण नाही, असं टोपे म्हणाले. 

बूस्टर डोससंदर्भात बोलताना ते म्हणाले की,  आता लसी देऊन एक वर्ष झाले आहे.  तर त्यांना बूस्टर डोस देण्यात यावा अशी मागणी केंद्राकडे केली आहे. 

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या तब्येतीविषयी माहिती देताना ते म्हणाले की, त्यांची तब्येत चांगली आहे. फिजिओथेरपी सुरू आहे.  ते पूर्ण करुन कामाला लागावं असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.  उद्या ते कॅबिनेटला VC वरून उपलब्ध असतील.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here