कल्याण डोंबिवलीत भाजपला धक्का, 3 माजी नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

660

मुंबई : शिवसेनेने कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला चांगलाच धक्का दिलाय. येथील भाजपच्या तीन माजी नगरसेवकांनी आज (22 नोव्हेंबर) शिवसेनेत प्रवेश केला. यात भाजपचे डोंबिवलीमधील महेश पाटील, सायली विचारे आणि सुनीता पाटील यांचा समावेश असून त्यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते हातावर शिवबंधन बंधून घेत जाहीरपणे शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यावेळी इतर पक्षातील कार्यकर्त्यांनीदेखील हाती शिवबंधन बांधलं.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि कल्याण-डोंबिवलीचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला. यावेळी बोलताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे आवाहन केले. तसेच आगामी कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवून देण्यासाठी पक्षप्रवेश करणारे सर्व कार्यकर्ते सर्वस्व पणाला लावतील अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली.

या तीन नगरसेवकांशिवाय आज पक्षप्रवेश करणाऱ्या पदाधिकारऱ्यांमध्ये माजी परिवहन समिती सदस्य संजय राणे, मनसे पदाधिकारी सुभाष पाटील, रवी म्हात्रे, विजय बाकोडे, सुजित नलावडे, पंढरीनाथ म्हात्रे, भालचंद्र म्हात्रे, प्रवीण म्हात्रे, राजाराम म्हात्रे, देवा माने, मोहन पुंडलिक म्हात्रे, हनुमंत ठोंबरे, विक्की हिंगे, उज्ज्वला काळोखे आणि इतर कार्यकर्ते यांचा समावेश होता.

यावेळी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण डोंबिवली मनपाच्या माजी महापौर विनिता राणे, शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उप जिल्हाप्रमुख राजेश कदम, उप जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, नगरसेवक दिपेश म्हात्रे तसेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here