नाशिक आगारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन जोरात सुरू आहेत. हे आंदोलन दडपण्यासाठी प्रशासन सक्रिय झाले असून, त्यांनी रोजंदारीवर काम करणाऱ्या 51 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस पाठवली आहे.
नाशिकः राज्यभर पेटलेला एसटी आंदोलनाचा वणवा आता भडकला असून, त्यात आर्थिक परिस्थितीमुळे हतबल कर्मचारी टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या पेठ आगारातील आणखी एका चालकाने कमी पगारामुळे आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. गहिनीनाथ गायकवाड, असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. गायकवाड यांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याचे समजते. दुसरीकडे जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचे आंदोलन अजून तीव्र केले असून, लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात. एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.
नाशिक आगारामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन जोरात सुरू आहेत. हे आंदोलन दडपण्यासाठी प्रशासन सक्रिय झाले असून, त्यांनी रोजंदारीवर काम करणाऱ्या 51 कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस पाठवली आहे. आतापर्यंत 85 हून अधिक कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. आता नोटीस पाठविलेल्या कर्मचाऱ्यांना चोवीस तासांच्या आत कामावर या, अन्यथा कारवाई करू असा इशारा दिला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाढला असून, आंदोलन पुन्हा चिघळण्याची शक्यात निर्माण झाली आहे. यात अनेक कर्मचारी कमी पगार आणि घरातील आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने टोकाचे पाऊल उचलत आहेत. पेठ आगारातील चालक गहिनीनाथ गायकवाड यांनी या आर्थिक कोंडीतूनच आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे.
13 डेपोंची सेवा ठप्पनाशिक जिल्ह्यात गेल्या 11 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 13 डेपोंची वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपाला संघर्ष कामगार युनियनने पाठिंबा दिला आहे. या संघटनेचे राज्य सरचिटणीस शशांक राव यांनी विभागातील डेपोंना भेट दिली. महामंडळाच्या सर्व मालमत्ता सरकारने ताब्यात घ्याव्यात. एसटी कर्मचाऱ्यांचे शासनाता विलीनीकरण करावे आणि त्यांना सहावा-सातवा वेतन आयोग लागू करावा, अशी मागणी केली आहे. दरम्यान, दुसरीकडे एसटी सेवा बंद असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. खासगी वाहतूकदारांनी प्रवासाचे दर दुप्पट केले आहेत. त्यामुळे दिवाळीसाठी बाहेरगावी गेलेल्या चाकरमान्यांची प्रचंड कोंडी झाली आहे. सरकारने लवकरात लवकर हा संप मिटवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.





