नौदलाचं ऐतिहासिक पाऊल; युद्धनौकेवर पहिल्यांदाच महिला अधिकारी तैनात
नवी दिल्ली- भारतीय सैन्यदलातही आता महिलांचा सहभाग वाढवण्यात येत आहे. स्त्री – पुरुष समानतेच्या दिशेने पुढे जाताना भारताच्या नौदलाने ऐतिहासिक पाऊल उचललं असून आपल्या युद्धनौकेच्या सदस्यांमध्ये पहिल्यांदाच दोन महिलांचा समावेश केला आहे. सब लेफ्टनंट कुमुदीनी त्यागी आणि सब लेफ्टनंट रीती सिंग या दोन महिला अधिकाऱ्यांना पहिल्यांदाच युद्धनौकेवर तैनात करण्यात आले आहे. नौदलामध्ये अनेक महिला उच्चपदावर आहेत. मात्र, त्यांना कधीही दिर्घकाळासाठी युद्धनौकेवर तैनात करण्यात आलं नव्हतं. सदस्यांच्या राहण्यासाठी असलेल्या क्वार्टर्समध्ये खाजगीपणाचा अभाव आणि युद्धनौकेत पुरुषांना ग्रहीत धरुन बनवण्यात आलेल्या बाथरुम सुविधा यासाठी येथे महिलांना तैनात केलं जात नव्हतं.
नौदलात नव्याने दाखल झालेल्या या महिला अधिकाऱ्यांमुळे बदल घडणार आहे. नौदलातील अनेक कामांसाठी उपयोगी पडणारी हेलिकॉप्टर्स जी सोनार कॉन्सोल अँड इंटिेलिजन्स, सर्व्हिलन्स आणि रिकॉइन्सेससाठी वापरली जातात त्यांना चालवण्यासाठी दोन्ही महिला अधिकारी प्रशिक्षण देतील. दोन्ही नौसेनेच्या एमएच 60 आर हेलिकॉप्टरमधून उड्डाण करतील असं म्हटलं जात आहे. या हेलिकॉप्टर्सचा उपयोग शत्रूच्या जहाजांचा आणि पाणबुड्यांचा शोध घेण्यासाठी केला जातो. ही अशी जहाजे किंवा पाणबुड्या असतात ज्यामध्ये मिसाइल किंवा टोर्पेडोस लावलेले असतात. 2018 मध्ये तत्कालिन संरक्षण मंत्री निर्मला सितारमन यांनी 2.6 बिलियन डॉलर्समध्ये हेलिकॉप्टरच्या खरेदीला मंजुरी दिली होती.




