बारामती तालुका पोलिसांची धडक कारवाई ; 312 किलो गांजासह 57 लाखांचा मुद्देमाल जप्त
September 21, 2020
बारामती // पाटस-बारामती रस्त्यावर बारामती तालुका पोलिसांनी सुमारे 47 लाख रुपयांच्या गांजासह 10 लाख रुपयांचा टेम्पो अशा एकूण 57 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. या प्रकरणी चौघांविरोधात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमांतर्गत कलम NDPS कायदा 1885 कलम 20 ( ब ) / 22 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उंडवडी गावच्या हद्दील ड्रायव्हर ढाब्याजवळ एक तपकिरी रंगाचा आयशर टेम्पोतून मोठ्या प्रमाणात गांजाची वाहतुक सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत सदरील टेम्पो थांबवून त्याची तपासणी केली. त्यात 11 पोती गांजा आढळून आला, या गांजाची बाजारातील किंमत सुमारे 46 लाख 93 हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा गांजा आंध्रप्रदेशमधून महाराष्ट्रात विक्रीसाठी आणला जात असल्याची प्राथमिक माहिती आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा तस्करीवर कारवाई केल्याने तालुका पोलिसांचे कौतुक होत आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक योगेश लंगूटे हे करीत आहेत.