कोविड १९’ विरुद्ध अधिक तीव्र संघर्ष!
नवीदिल्ली : टाटा क्रिस्पर चाचणीला मान्यता मिळाली असून टाटा समूह आणि ‘सीएसआयआर’च्या रिसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायॉलॉजी या संस्थांनी या चाचणीसाठी लागणारी साधने व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध केली आहेत. ही चाचणी अवघ्या पाचशे रुपयांत होईल. यामुळे कोविड १९ विरोधातील संघर्ष अधिक तीव्र करता येणार आहे, अशी माहिती टाटा मेडिकल अँड डायग्नॉस्टिक्स लिमिटेडचे गिरीश कृष्णमूर्ती यांनी दिली.
ते म्हणाले, ‘कोरोना विषाणूच्या संसर्गावरील ‘फेलुदा’ चाचणीला भारताच्या औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. या चाचणीत क्रिस्पर म्हणजे ‘क्लस्टर्ड रेग्युलरली इंटरस्पेसड शॉर्ट पॅलिनड्रोमिक रिपीटस’ तंत्राचा अवलंब केला आहे.
हे जनुकीय संपादन तंत्रज्ञान असून त्याच्या मदतीने रोगांचे निदान करता येते. प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शक आणि लेखक सत्यजित राय यांच्या कादंबऱ्यांतील फेलुदा या गुप्तहेर पात्राचे नाव या चाचणीस देण्यात आले आहे.
फेलुदा चाचणीची अचूकता आरटी-पीसीआर इतकी आहे. आरटी पीसीआर चाचणीला ४ हजार ५०० रुपये खर्च येतो, तर फेलुदा चाचणीला केवळ पाचशे रुपये लागतात. औषध महानियंत्रक समितीने या चाचणीला मान्यता दिली आहे.
सीएसआयआरच्या निवेदनात म्हटले आहे की, ही चाचणी ९६ टक्के संवेदनशील आणि ९८ टक्के विशिष्टता दाखवणारी आहे. कोरोना विषाणूचा शोध घेण्यासाठी यात ‘कॅस ९’ प्रथिनांचा यशस्वी वापर करण्यात आला आहे.