नेवासा – फक्त तेरा वर्षाच्या मुलीचे आई आणि मावशीने लग्न लावून दिले . लग्नानंतर सदर मुलीस सासरी अतोनात छळाला सामोरे जावे लागले . ही बाब मुलीच्या आजोबांच्या कानावर आल्यानंतर हा प्रकार उघड आला . याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात बुधवारी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तिची आई , मावशी , काका , पती व सासू सासऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
नेवासा तालुक्यातील एका गावात ही घटना घडली .तालुक्यातील एका गावातील इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलीचे काही दिवसांपूर्वी लग्न लावून देण्यात आले.सासरी गेल्यानंतर पतीने तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले . तसेच घरकाम येत नाही म्हणून पती , सासू – सासरा मुलीस सतत शिवीगाळ करून मारहाण करत होते . तसेच मुलीस बाहेरची बाधा झाली आहे , असा समज करून घेत तिला राहुरी तालुक्यातील एक भोंदूबाबा व नेवासा तालुक्यातील आणखी एका भोंदूबाबाकडे घेऊन गेले .
लग्न
त्या भोंदूबाबाने या मुलीचा हात पिरगळून तिला मारहाण केली . त्यानंतर ५ सप्टेंबर रोजी सदर मुलीच्या पतीने तिला माहेरी काढून दिले . आईने मुलीला तिच्या आजोबाकडे पाठविले . मुलीने सर्व प्रकार आजोबास सांगितला . त्यानंतर याप्रकरणी फिर्याद देण्यात आली . या गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम , बालविवाह प्रतिबंध अधिनियम , नरबळी , अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
नेवासा पोलिस ठाण्यात भादवी कलम ३७६ (एन) बालकांचे लैंगिक अत्याचार पासून सरंक्षण अधिनियम २००६ कलम ९, १०, ११ महाराष्ट्र नरबळी, इतर अनिष्ट आघोरी प्रथा व जादू टोना यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा. पो. नि. विजय ठाकूर करत आहेत.