मंगल कार्यालयाचा खर्च लाखांच्या पटीत पण उत्पन्न मात्र शून्य

    844

    मंगल कार्यालयाचा खर्च लाखांच्या पटीत पण उत्पन्न मात्र शून्य

    पुणे – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील सहा महिन्यांपासून राज्यातील लग्नकार्य, वाढदिवस, यासह विविध कार्यक्रमासाठी लागणारे लॉन्स, मंगलकार्यालय बंद आहेत. परंतु कार्यालयासाठी महिन्याला लाईट बिल, महापालिका कर, कर्मचारी पगार यासह सर्व खर्च महिन्याला तीन ते साडे तीन लाखांच्या घरात आहे. सध्या शहरातील मंगल कार्यालयाचा खर्च लाखांच्या पटीत पण उत्पन्न मात्र शून्य अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मंगलकार्यालयांच्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. शासनाकडून किमान कार्यालयाच्या क्षमतेनुसार ५० टक्के लोकांना परवानगी द्यावी. ज्यातून किमान मासिक खर्च निघेल इतके उत्पन्न सुरू होईल. अन्यथा कार्यालये चालू ठेवणे अशक्य आहे. तसेच त्याच्या मेंटनंसचा खर्च करणे वास्तविक परिस्थितीत अशक्य आहे.

    शासनाने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी अनेक महिन्यांपासून कौटुंबिक कार्यक्रमास फक्त ५० लोकांना परवानगी दिली आहे. मंगल कार्यालये यांची क्षमता मोठी आहे. ५० लोकांना याचे भाडे परवडत नाही. त्यामुळे सध्या बुकिंग मिळत नाहीत. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून मंगलकार्यालयाच्या कार्यक्रमांची नोंदणी बंद आहे. त्यामुळे लाखोंचे नुकसान होत असून महिन्याचा मेंटनंस, कर्मचाऱ्यांचा पगार खर्च देखील निघत नसल्याची भावना या व्यावसायिकांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखविली. यश लॉन्सचे श्रीपाल ओसवाल, अविनाश कोठारी, श्री जी लॉन्सचे अशोक शहा, तालेरा गार्डनचे सुभाष तालेरा, मोहित पिंगळे, समिर काथुरे, दिपेन शहा, पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल उपस्थित होते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here