“बॉलिवूडमधील घराणेशाहीचा त्रास कधीच झाला नाही/
घराणेशाही आणि गटबाजीच्या प्रकरणावर अभिनेता पंकज त्रिपाठीने व्यक्त केले परखड मत
मुंबई : घराणेशाही आणि गटबाजीच्या प्रकरणावर आता अभिनेता पंकज त्रिपाठी याने परखड मत व्यक्त केले आहे. एका मुलाखतीच्या माध्यमातून त्याने आपल्याला आलेल्या अनुभवांच्या आधारे सध्याच्या वादग्रस्त मुदयांवर भाष्य केले. आपल्याला आजवर बॉलिवूडमधील घराणेशाहीचा त्रास झाला नसल्याचे त्याने सांगितले. आजवर केलेला संघर्ष काही सोपा नव्हता. लोकांनी आपल्याला ओळखावे यासाठी आठ वर्षे झगडावे लागले. असे तो सांगतो.
घराणेशाहीचा मला अनुभव आलेला नाही. इतरांच्या बाबत असा अनुभव असल्याने ते परखडपणे आपले मत व्यक्त करत आहेत. तुमच्याकडे अभिनयाचे कलागुण असतील तर फारशी काळजी करण्याची गरज नसते. तुम्ही प्रतिभावान असाल तर प्रेक्षक तुम्हाला पसंद करतात. इंडस्ट्रीत घराणेशाही वरुन गोष्टी झाल्या नाहीत असं मी म्हणणार नाही. इतरांपेक्षा स्टारकिड्सना लवकर संधी मिळते. कारण ते विशिष्ट कुटुंबातून आलेले असतात. मात्र मला अशाप्रकारची संधी कधीच सहज मिळाली नाही. पण, मला कुणी थांबवलंसुद्धा नाही. तुम्ही आठ वर्षांनी मोठे कलाकार व्हा किंवा आठ दिवसांनी, जर तुमच्याकडे प्रतिभा नसेल तर तुम्ही या इंडस्ट्रित टिकू शकत नाही.
प्रेक्षक खूप सुजाण आहेत. त्यांना बरोबर माहिती असतं की कोण प्रतिभावान आहे आणि कोण नाही.’ चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी मी खूप मेहनत केली. लोकांनी मला ओळखण्यापूर्वी आठ वर्षं मी खूप संघर्ष केला.’ ‘मी माझ्या अभिनय कौशल्यावर काम करत होतो. आजही करतोय; हेच पुढेदेखील कायम राहील. इंडस्ट्रीमध्ये मला कधीच वेगळं वाटलं नाही; असं मी म्हटल्यावर कदाचित लोकांना मी खोटं बोलतोय असं वाटेल. पण, हा प्रवास आणि अनुभव माझा आहे. त्यामुळे आतापर्यंत तो कसा होता हे मीच सांगू शकतो. माझ्या वाट्यालासुद्धा संघर्ष आला हे सत्य आहे, असेही त्याने म्हटले आहे.