महिलांवर होणारे अत्याचार, छेडछाडीचे उच्चाटन होण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांच्या वतीने ‘निर्भया’ पथकाची स्थापना करण्यात आली आहे. महिलांची सुरक्षा आणि संरक्षण वाढवण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे. समाजामध्ये महिलांविषयी आदरयुक्त भावना निर्माण करणे आणि कायद्याची भीती निर्माण करणे या उद्देशाने तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचार, छेडछाडीचे समूळ उच्चाटन होण्यासाठी ‘निर्भया’ पथकाची स्थापना करण्यात येत आहे. यामुळे महिलांना सुरक्षा कवच लाभेल, अशी आशा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली.
तसेच, मुंबई पोलीस दला मार्फत M POWER संस्थेच्या सहभागातून ‘सक्षम’ हा उपक्रम पीडित महिला, पोस्को कायद्यांतर्गत गुन्हयातील पीडित, अल्पवयीन मुला-मुलींच्या मानसिक सक्षमीकरणासाठी समुपदेशनाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे.
निर्भया पथक व सक्षम उपक्रमांतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यात वुमेन सेफ्टी सेल स्थापन केला जाणार असून मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यातील ‘मोबाइल-५’ गस्त वाहनास ‘निर्भया पथक’ असे संबोधण्यात येणार आहे.







