जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक
आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन
वाशिम, दि. ०९ (जिमाका) : वाशिम जिल्हा परिषद निवडणूक विभाग व त्याअंतर्गंत पंचायत समितींच्या निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे तसेच पोटनिवडणुकीकरिता लागू करण्यात आलेल्या आदर्श आचारसंहितेच्या तरतुदींचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आहे.
वाशिम जिल्हा परिषदेचे १४ निवडणूक विभाग आणि सहा पंचायत समित्यांच्या २७ निर्वाचक गणांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने १३ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर केला आहे. संबंधित क्षेत्रात या पोटनिवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहणार आहे.