भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव कार्यक्रमात पहिले पंतप्रधान पं. जवाहर लाल नेहरू यांचे डिजिटल छायाचित्र इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च (आयसीएचआर)ने प्रसिद्ध न केल्याने वाद उत्पन्न झाला आहे. काँग्रेसने आयसीएचआरच्या या कृतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली असून काँग्रेससह अन्य राजकीय पक्षांनी सरकारच्या गलिच्छ व तुच्छतापूर्ण राजकारणाचा धिक्कार केला आहे.
आयसीएचआरच्या वेबसाइटवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या छायाचित्रात पं. नेहरू सोडून म. गांधी, डॉ. आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी बोस, राजेंद्र प्रसाद, भगत सिंग, मदनमोहन मालवीय व सावरकर यांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत.प. नेहरूंचे डिजिटल छायाचित्र हेतूपुरस्सर प्रसिद्ध न करण्याच्या आयसीएचआरच्या कृतीवर विविध राजकीय पक्ष व समाजातील विविध घटकातून टीका झाल्यानंतर खडबडून जाग आलेल्या या संस्थेने पुढे प्रसिद्ध होणार्या डिजिटल छायाचित्रांत पं. नेहरु यांचे छायाचित्र असेल अशी सारवासारव केली.