राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुरस्कार प्राप्त आणि पदकविजेत्या खेळाडूंचा सत्कार
जिल्हा क्रीडा संकुलात जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न
राज्यमंत्री कु. तटकरे यांचे प्रतिपादन
अहमदनगर: जिल्ह्यात मर्यादित क्रीडा सुविधा असताना अनेक खेळाडू पदक विजेते ठरले. त्यांचा खऱ्या अर्थाने सन्मान करणे यासाठी कायम सुविधा उपलब्ध करून देणे महत्वाचे आहे. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम येथे आहे. येत्या काळात जास्तीत जास्त सुविधा पुरविण्याचा आणि क्रीडा विकासासंबंधी प्रस्तावांचा सकारात्मक सहकार्य करण्याचा आपला प्रयत्न राहील, असे प्रतिपादन राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधि व न्याय राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी केले.
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर आणि जिल्हा क्रीडा संघटना, क्रीडा शिक्षक, खेळाडू आणि क्रीडा प्रेमी नागरिक, जिल्हा क्रीडा संकुल समिती यांच्या वतीने आज राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यमंत्री कु. तटकरे बोलत होत्या. आमदार संग्राम जगताप, प्रा.माणिक विधाते,श्री. लोटके सर, जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे आदी उपस्थित होते
सुरुवातीला हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू प्राजक्ता नगरकर (ज्युदो), मनीषा पुंडे (ज्युदो), विलास दवणे (पॉवरलिफ्टींग), सतीश झेंडे (सायकलिंग),आप्पासाहेब दूस (साहसी क्रीडा प्रकार), श्वेता गवळी ( खो – खो) सुनील जाधव ( कब्बडी) यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. तसेच राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पदकविजेते खेळाडू प्रणिता सोमण, आदित्य धोपावकर, दिव्यांगी लांडे, वेदांत वाघमारे, वैष्णवी गोडळकर यांचाही गौरव राज्यमंत्री कु. तटकरे यांनी केला.
यावेळी राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या, क्रीडा व युवक कल्याण हा महत्वाचा विभाग आहे. युवकांच्या दृष्टीने महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्याची जबाबदारी येते.या विभागाच्या माध्यमातून नगरच्या क्रीडा विकासासाठी कायम सहकार्य करण्याची भूमिका राहणार आहे.
रस्ते, वीज, पाणीपुरवठा याबरोबरच क्रीडा विकासासाठी मदत करणे, खेळाडूंना प्रोत्साहन देणे तितकेच महत्वाचे आहे. खेलो इंडिया स्पर्धेत आपल्या राज्याने मागील दोन वर्षात चांगले यश मिळवले आहे. आपल्या राज्याने केंद्र सरकारकडे काही प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत. त्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. नगर येथील नेमबाजी केंद्राचा प्रस्ताव मंजूर करून केंद्राकडे पाठविला असल्याचे त्या म्हणाल्या.
खेळाडू संधीच सोने करण्यासाठी प्रयत्न करीत असतात. चांगली कामगिरी करण्याचा दबाव कायम त्यांच्यावर असतो. अशावेळी खेळाडूंच्या शारीरिक कणखरपणा बरोबरच त्यांना मानसिक कणखर बनवणे आवश्यक आहे. क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक यांनी त्यासाठी लक्ष दिले पाहिजे, असे राज्यमंत्री कु. तटकरे यांनी नमूद केले.
यापूर्वी तालुका क्रीडा संकुलासाठी १ कोटी रुपये निधी दिला जात होता. आता नव्याने मंजुरी मिळालेल्या तालुका क्रीडा संकुलासाठी १ कोटी रुपया ऐवजी ५ कोटी निधी मिळणार आहे. क्रीडा सुविधा साठी निश्चीत त्याचा लाभ होणार असल्याचे त्या म्हणाल्या.
खेळाडूंना प्रमाणपत्रासाठी कार्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागतात असा उल्लेख काही वक्त्यांनी केला होता. त्याचा उल्लेख करून राज्यमंत्री कु. तटकरे म्हणाल्या, खेळाडूंची फरफट होणार नाही याची काळजी घेऊ. त्यादृशिने व्यवस्था मध्ये कशा पद्धतीने बदल करावा लागेल याचा नक्की विचार करू. पुढच्या काळात ऑलिम्पिक आणि कॉमन वेल्थ गेम्स मध्ये महाराष्ट्राचा सहभाग अधिक असेल आणि त्यात अहमदनगरचे खेळाडू जास्त प्रमाणात असावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
आमदार जगताप म्हणाले, नगर जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा दिनाला क्रीडा विभागाचे मंत्री उपस्थित आहेत ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. पुढच्या पिढीला प्रेरणा देणारे खेळाडू नगर शहर आणि जिल्ह्यातून तयार होत आहेत. नव्या पिढीला क्रीडा सुविधा देण्यासाठी आपण राज्यमंत्री कु. तटकरे यांच्या पाठिंब्याने निश्चित प्रयत्न करू. खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची विनंती त्यांनी केली.
कार्यक्रमात विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, क्रीडा प्रशिक्षक दिनेश भालेराव, राजेन्द्र कोतकर, संजय साठे, अजय पवार, आप्पासाहेब शिंदे, मल्हार कुलकर्णी आदींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. मेजर ध्यानचंद यांचा जीवनप्रवास भरत बिडवे यांनी कथन केला. वाटचाल आधुनिक शारीरिक शिक्षणाची या नियतकालिकाचे प्रकाशन यावेळी राज्यमंत्री कु. तटकरे यांनी केले.
कार्यक्रमानंतर शालेय खेळाडूंच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यास राज्यमंत्री कु. तटकरे यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी जिल्हा क्रीडा संकुल येथील विविध सुविधांची पाहणी केली.
प्रास्ताविक श्री. मोहारे यांनी केले. सूत्रसंचालन ज्ञानेश्र्वर खुरांगे यांनी केले. क्रीडा कार्यालयाचे दीपाली बोडके, दिलीप दिघे, विशाल गरजे यांच्यासह शारीरिक शिक्षक, खेळाडू, क्रीडा प्रशिक्षक, नागरिक यावेळी उपस्थित होते.****