केमिकल फॅक्टरीची आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न; पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनीही केली पाहणी

418

केमिकल फॅक्टरीची आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न; पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनीही केली पाहणी


महत्वाच्या इमारतींचे फायर ऑडिट ‘मिशनमोड’वर पूर्ण करा
– पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर
      येथील औद्योगिक वसाहतीतील नॅशनल पेस्टिसाईड अँड केमिकल्स या फॅक्टरीला काल मध्यरात्रीनंतर आग लागली. ही फॅक्टरी ऑक्सिजन प्लँटच्या बाजूला आहे. या घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली व संबंधितांकडून सविस्तर माहिती घेतली. सर्व महत्वाच्या इमारतींचे फायर ऑडिट 'मिशन मोड'वर पूर्ण करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी यावेळी प्रशासनाला दिले.


      जिल्हाधिकारी पवनीत कौर, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, तहसीलदार संतोष काकडे आदी यावेळी उपस्थित होते.

      उद्योग, कारखाने, इमारती यांचे फायर ऑडिट करण्याबाबत यापूर्वी वेळोवेळी आदेशित करण्यात आले आहे. ती कार्यवाही मोहिम स्तरावर तत्काळ पूर्ण करावी. सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व महत्वाच्या इमारतीचे फायर ऑडिट पूर्ण होणे आवश्यक आहे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

      आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत. महापालिकेचे ६ व इतर शहरातील ५ असे एकूण ११ अग्निशमन वाहने व दलांकडून आग विझवण्यासाठी तातडीने पोहोचून प्रयत्न करण्यात येत आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही, अशी माहिती तहसीलदार संतोष काकडे यांनी दिली.

०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here